नाशिक – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काल झालेल्या परीक्षेवेळी एका केंद्रावर २८ वर्षीय परीक्षार्थीला अचानक प्रसुतीकळा सुरू झाल्या. यावेळी प्रशासनाची धावपळ झाली. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत संबंधित महिलेस रुग्णालयात दाखल केले.
काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फेत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा झाली. या परीक्षेसाठी मालेगावहून युगंधरा गायकवाड (२८) या सकाळी नाशिक येथील व्ही.एन.नाईक महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर दाखल झाल्या होत्या. १० वाजता परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटात युगंधरा यांना प्रसूती वेदनांचा त्रास सुरू झाला. परीक्षा सुरू असतानाच रक्तस्त्रावही झाला. त्यामुळे त्यांची तब्येत खालावली होती. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांना केंद्राबाहेर आणले. केंद्रावर बंदोबस्तासाठी असलेले हवालदार जयंत जाधव आणि रोशनी भामरे यांनी तत्काळ युगंधरा यांना शासकीय वाहनातून जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, याचवेळी युगंधराचे पती गोरख हे दुसऱ्या केंद्रात परीक्षा देत होते. पोलिसांनी त्यांना माहिती दिल्यानंतर तेही रुग्णालयात पोहचले. युगंधरा यांच्यावर प्रसुतीसाठी शस्त्रक्रिया झाली. युगंधरा व गोरख या दाम्पत्याला कन्यारत्न झाली असून, बाळ तसेच आई युगंधरा दोघींची प्रकृती स्थिर आहे. युगंधराच्या नातेवाईकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.