मुंबई – महाराष्ट्रात तिसर्या आघाडीचा पर्याय म्हणून आठ पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या परिवर्तन महाशक्तीने आपल्या 8 उमेदवारांच्या नावाची पहिली यादी आज घोषित केली. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू, राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती व इतर संघटनेच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन यादी जाहीर केली.
आज घोषित 8 उमेदवारांच्या व्यतिरिक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शिरोळ व मिरज या दोन जागा देण्यात आल्या आहेत. या 2 उमेदवारांची नावे उद्या जाहीर होणार आहेत. बच्चू कडू यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले की, 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 4 नोव्हेंबरला भूकंप होणार आहे. वेगळेच चित्र दिसणार आहे. महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारा स्फोट 4 नोव्हेंबरला होईल.
परिवर्तन महाशक्तीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. बच्चू कडू अचलपूर, अनिल छबिलदास चौधरी रावेर यावल, गणेश रमेश निंबाळकर चांदवड, सुभाष साबणे देगलूर बिलोली या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. महाराष्ट्र स्वराज पक्षाकडून ऐरोलीतून अंकुश सखाराम कदम व हदगाव हिमायतनगरमधून माधव दादा देवसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य समितीच्या गोविंद सयाजी भवर यांना हिंगोलीतून तर स्वतंत्र भारत पक्षाकडून वामनराव चटप यांना राजुरातून तिकीट देण्यात आले आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, 75 वर्षे दोन्हीकडील लोकांनी तीच आश्वासने दिली. परंतु ती कधीच पूर्ण केली नाही. त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत . बच्चू कडू म्हणाले की, महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा व काँग्रेसमधील वाद व शिवसेना शिंदे गटाच्या जागांवर भाजपाची कुरघोडी त्यांच्यातून एकेक पक्ष बाहेर पडतील. हे सगळे पक्ष कोणत्याही विचारांनी एकत्र आलेले नसून त्यांची आघाडी केवळ सत्तेसाठी आहे. आघाडी व युतीतील पक्षांना अधिकाधिक जागा हव्या आहेत. त्या मिळाल्या नाहीत तर ते एकमेकांचे उमेदवार पाडणार आहेत. काहीजण आमच्याशी या संदर्भात चर्चा करत आहेत. त्यामुळे आमची तिसरी आघाडी कधी पहिल्या नंबरवर जाईल हे तुमच्या लक्षातही येणार नाही.