रत्नागिरी- मुंबई- गोवा महामार्गावर रत्नागिरी – चिपळूण दरम्यान असलेला परशुराम घाट हा महत्वाचा टप्पा मानला जातो.मात्र याच घाटात पावसाळ्यात भूस्खलनाच्या घटना घडत असतात.या घटनांची कारणे शोधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून परशुराम घाटात माती परीक्षण करण्यात येणार आहे.
हे माती परीक्षण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता यांच्यासह प्रमुख अधिकारी परशुराम घाटात दाखल झाले आहेत. माती परीक्षण झाल्यानंतर आवश्यतेनुसार घाटातील संरक्षक भिंत उभारण्याची नवी डिझाईन तयार केली जाणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर महिन्यातच पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र कामाचा गती खूपच कमी आहे. या मार्गावरील नागोठणे, कोलाड,पुई,माणगाव,लोणेरे आणि टेमपाले येथील प्रमुख पुलांची कामे रखडलेली आहेत.त्यामुळे शासनकर्त्यांनी दिलेली डेडलाइन पुन्हा हुकणार आहे.महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासी त्रस्त आहेत. १२ वर्षांपेक्षा अधिक काळ चाललेले हे काम कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.