बंगळुरू- पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील दोन आरोपींची जामनावर सुटका झाल्यानंतर हिंदुत्ववाद्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. विशेष न्यायालयाने ९ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केल्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी ते आपल्या मुळ गावी आले असता हा भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील आरोपींचाही अशाच प्रकारे सत्कार करण्यात आला होता.
पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील दोन आरोपी परशुराम वाघमारे व मनोहर यादवे यांची सुटका झाल्यानंतर ते आपले मूळ गाव विजयपुरा येथे आले असता आयोजित स्वागत समारंभ आयोजित करून त्यांना पुष्पमाला घालण्यात आल्या. तसेच भगव्या शाली देण्यात आल्या. मंत्रोच्चारात त्यांचे स्वागत झाले. त्यानंतर ते कालिका मंदिरात दर्शनासाठी गेले. या हत्या प्रकरणात त्यांचा संबंध नसल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. हे दोघे सहा वर्षानंतर कारागृहातून बाहेर आले आहेत. त्यांच्या बरोबर या खटल्यातील इतर आरोपी अमोल काळे, राजेश डी बंगेरा, वासुदेव सुर्यवंशी, ऋषिकेश दावडेकर, गणेश मिस्किन व अमित बड्डी यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
या स्वागत समारंभात एका हिंदुत्ववादी नेत्याने म्हटले की, आज महत्त्वाचा विजयादशमीचा दिवस आहे. या दोघांना चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. या प्रकरणातील खरा आरोपी अद्याप मोकाट असून केवळ हिंदुत्ववादी असल्यामुळे त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले आहे.
पत्रकार गौरी लंकेश हत्येच्या आरोपींचे हिंदुत्ववाद्यांकडून स्वागत
