बंगळुरु – पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींपैकी कोठडीत असलेल्या एका आरोपीला काल बंगळुरु न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे या हत्या प्रकरणातील सर्वच १७ आरोपी आता जामिनावर बाहेर आले आहेत.
बंगळुरु न्यायालयाचे न्यायाधीश मुरलीधर पै बी यांनी काल शरद भाऊसाहेब काळस्कर याला जामीन मंजूर केला. या प्रकरणी पोलिसांनी १८ आरोपींची नावे असल्याचे निश्चित केले होते. त्यातील १७ आरोपींना अटक करण्यात आली होती, तर विकास पाटील हा आरोपी अद्याप फरार आहे. काळस्कर याने आपण निर्दोष असून आपला या प्रकरणात काहीही सहभाग नसल्याचे जामीन अर्जात म्हटले होते. इतर आरोपींना जामीन मिळाला असल्याने आपल्यालाही जामीन मिळावा, अशी मागणी त्याने केली होती. फिर्यादी पक्षाने त्याच्या जामिनाला विरोध केला होता. त्याला जामिनावर सोडल्यास तो इतरही गुन्हे करू शकतो, असा युक्तिवाद त्यांनी केला होता. तो अमान्य करत न्यायालयाने इतर आरोपींना जामीन मिळाला आहे, या आधारावर त्याला जामीन मंजूर केला.