नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट संबोधून गंभीर आरोप करणाऱ्या काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात संघाचे मुख्यालय असल्याने तिथे काँग्रेस पराभूत व्हावी यासाठी नाना पटोले यांनी जाणूनबुजून पक्ष संघटन कमजोर ठेवले. आपल्याला कुठलीही मदत न केल्याच्या आरोपाचाही पुनरुच्चार बंटी शेळके यांनी केला आहे. माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात काँग्रेस आहे. मात्र, मी नाना पटोले यांचा शिपाई नसून राहुल गांधी यांचा शिपाई आहे, असेही बंटी शेळके म्हणाले.
नाना पटोले यांच्यावर टीका केल्याप्रकरणी शेळके यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यावर ते म्हणाले की, मला मिळालेल्या कारणे दाखवा नोटिशीसंदर्भात मी उत्तर दिले आहे. त्यांना मी जे प्रश्न विचारले होते, त्याचे उत्तर मला मिळालेले नाही. निवडणूक काळात मी असे प्रश्न विचारले असते, तर कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले असते, त्यामुळे तेव्हा मी असे आरोप लावले नाही. सन्माननीय संघ एजंट नाना पटोले यांच्या मतदारसंघातील मी देवरी बॉर्डरवर आरटीओ विरोधात आंदोलन केले, तेव्हाही नाना पटोले यांनी पाठिंबा दिला नाही.. उलट माझ्यावर हल्ला झाला. तेव्हा ही नाना पटोले एकही शब्द बोलले नाहीत.