माजी आमदार आशिष देशमुख
यांचे अखेर काँग्रेसमधून निलंबन

नागपूर – माजी आमदार आशिष देशमुखांचं अखेर काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले. शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली असून आशिष देशमुखांना कारणे दाखवा ही नोटीस बजावण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी माध्यमांसोबत बोलताना आशिष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली होती. तेव्हापासून आशिष देशमुखांच्या निलंबनाची चर्चा सुरू होती, तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचेही बोलले जात होते. यादरम्यानच काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यतेखाली मुंबईत बैठक झाली. या बैठकीत आशिष देशमुखांचे निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कारणे दाखवा ही नोटीस बजावण्यात आली. माहितीनुसार, या नोटीशीला तीन दिवसात उत्तर द्यावे, असे शिस्तपालन समितीने निर्देश दिले आहेत. या नोटीशीचे उत्तर येईपर्यंत देशमुखांचे काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले आहे.
ओबीसी समाजाबद्दल केलेल्या विधानाबद्दल राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, असे विधान देशमुख यांनी केले होते. नाना पटोले हे महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल करण्यासाठी खोडा घालत आहेत, असे म्हणत पटोलेंची वेगळी चूल मांडण्याचे संकेत असल्याचा दावा देशमुख यांनी केला होता.

Scroll to Top