अहमदाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातील ३ वंदे भारत रेल्वे गाड्यांना दूरदृश्य प्रणाली द्वारे हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यांच्या हस्ते आज देशभरातील विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण करण्यात आले. राज्यातून धावणार्या पुणे-हुबळी, कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा कंदील दाखवला. याबरोबरच दुर्ग ते विशाखापट्टणम आणि आग्रा छावणी ते वाराणसी या रेल्वेगाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पुण्याहून ही वंदे भारत रेल्वे रवाना झाली तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ही रेल्वे सुरू केल्याबद्दल मोदी यांचे आभार मानले.
पंतप्रधानांनी आज गुजरातमधील अहमदाबाद ते गांधीनगर या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटनही केले. त्यांनी या मेट्रोतून प्रवास केला. यानंतर त्यांनी तमिळनाडूच्या थूथुकडी बंदराच्या नव्या आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलचेही उद्घाटन केले. या टर्मिनलमधील ४० टक्के कर्मचारी महिला असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या गांधीनगर येथे चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या परिषदेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज असून याचाच भाग म्हणून सरकारने २० हजार कोटी रुपयांच्या ग्रीन हायड्रोजन मिशनला सुरुवात केली आहे. भारताने हरित ऊर्जा क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ३१ हजार मेगावॉट जलविद्युत निर्मितीच्या प्रकल्पाचे काम सुरू असून यासाठी १२ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.