सांगली- छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजांची माफी मागितली. पण हा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळला आहे. त्यातून शिवाजी महाराजांचा घोर अपमान झाला आहे. त्यामुळे मोदींनी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागून चालणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची मोदी यांनी माफी मागितली पाहिजे, असा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केला. कडेगावच्या सोनहिरा सहकारी साखर कारखाना येथील स्मृतीस्थळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
‘पंतप्रधान मोदी यांनी माफी कशाबद्दल मागितली? पुतळा बनविण्याचे काम संघाच्या माणसाला दिले म्हणून माफी मागितली? पुतळा बनविताना अक्षम्य दुर्लक्ष झाले म्हणून माफी मागितली की, पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली? महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील जनतेची माफी मागावी अशी अनेक कामे पंतप्रधानांनी केली आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तीन काळे कायदे मोदी यांनी आणले. त्याविरूध्द लढा देताना 700 शेतकरी शहीद झाले. याबद्दल मोदी यांनी माफी मागावी. नोटबंदी करून मध्यम, छोट्या व्यावसायिकांना उद्ध्वस्त केले. त्याबद्दल मोदी यांनी माफी मागावी, चुकीच्या पध्दतीने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करून मध्यम आकाराचे उद्योग संपवले. त्याबद्दल मोदींनी माफी मागावी’, अशा शब्दात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.
जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावरून राहुल गांधी यांनी भाजपा आणि संघ परिवारावर जोरदार टीका केली. ‘जातनिहाय जनगणना नकोच असे भाजपा आणि संघवाले काल परवापर्यंत सातत्याने म्हणत होते. मात्र काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी कबुली दिली. पण प्रत्यक्षात त्यांना अशी गणना नकोच आहे. दलित हा दलितच राहावा, मागासवर्ग आहे त्याच स्थितीत राहावा, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या घामाचे चीज त्यांना मिळू नये अशी भाजपा आणि संघाची मानसिकता आहे. केंद्रात जर इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर सर्वात पहिल्यांदा जातनिहाय जनगणना केली जाईल. आम्ही जातीय जनगणना करणारच आहोत. देशाच्या संपत्तीचे वाटप कसे होते आहे हे कळले पाहिजे. मूठभर लोकांकडे संपत्ती राहता कामा नये, अशी ग्वाही राहुल गांधी
यांनी दिली.
अदानी-अंबानी आणि पाच-पंचवीस उद्योगपतींसाठी सरकार चालविण्याचा आरोप पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा करताना राहुल गांधी म्हणाले की, देशाची संपत्ती अदानी आणि अंबानींना देण्यासाठी मोदी सरकार चालवित आहेत. अदानी-अंबानी वगळता आणखी पंचवीसएक उद्योगपतींचे भले व्हावे हेच मोदींचे धोरण आहे. या उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज मोदी सरकारने माफ करून टाकले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी मोदींकडे
पैसे नाहीत.
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरून मोदींवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले, मणिपूरमध्ये मागील एक-दीड वर्षांपासून हिंसाचार उफाळला आहे. भाजपाचे लोक या हिंसाचाराला कारणीभूत आहेत. त्यांनीच दोन समाजांमध्ये फूट पाडली आहे. त्यामुळे मोदींना गेल्या दीड वर्षांत एकदाही मणिपूरला भेट द्यायची हिंमत झाली नाही.
पान 1 वरून
जे प्रेम माझ्या वडिलांना दिले
तेच मला द्या! विश्वजित कदम
पतंगराव कदम यांचे पुत्र आमदार विश्वजीत कदम भाषणात म्हणाले की, राहुल गांधी जनतेची लढाई लढत आहेत, त्यांना आपण साथ देऊया. राहुलजी महाराष्ट्रात जनता आपल्या नेतृत्वात लढेल, 1960 मध्ये पतंगराव कदम जेव्हा राजकारणात आले तेव्हापासून ते कायम गांधी परिवाराबरोबर राहिले. 1978 मध्ये जेव्हा काँग्रेसचे दोन भाग झाले तेव्हा सांगली जिल्ह्यातून मोहनराव कदम आणि पतंगराव कदम हे दोनच काँग्रेसचे नेते त्यांच्या बरोबर होते. त्यानंतर सोनिया गांधी यांच्या बरोबर कायम राहिलो . आज या रॅलीने पूर्ण महाराष्ट्रात एक वातावरण निर्माण होईल, पूर्ण महाराष्ट्र आपल्याबरोबर आहे, जे प्रेम माझ्या वडिलांना मिळाले ते प्रेम मला द्या . माझ्या वडिलांची शपथ घेतो मी कधी कमी पडणार नाही.