नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचे नवीन प्रादेशिक कार्यालय आणि भारतातील इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते भारत ६-जी व्हिजन डॉक्युमेंटचे अनावरण करण्यात आले. दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज भारत जी-२० बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवत आहे. प्रादेशिक अंतर कमी करणे हे आमचे प्राधान्य आहे. ग्लोबल साउथची तांत्रिक विभागणी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका आहे. यामध्ये आयटीयूचे एरिया ऑफिस आणि इनोव्हेशन सेंटर खूप महत्त्वाचे ठरेल.
भारतात दर महिन्याला ८०० कोटी रुपयांची देवाणघेवाण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस माध्यमातून होते. दररोज ७० दशलक्ष ई-ऑथेंटिकेशन होतात. थेट लाभ हस्तांतरणाद्वारे नागरिकांच्या बँक खात्यांमध्ये २८ लाख कोटींहून अधिक रक्कम पाठवण्यात आली आहे. ५- जी लाँच केल्याच्या ६ महिन्यांत आम्ही ६-जी तंत्रज्ञानाबद्दल देखील बोलत आहोत. यातून भारताचा आत्मविश्वास दिसून येत आहे, असे मोदी म्हणाले.