सोलापूर- पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २२ ठिकाणी असलेल्या एटीएममधून विविध बँकांचे एटीएम कार्ड वापरून ३ कोटी ३ हजार २०० रुपये लंपास करण्यात आले. २४ मार्च ते १९ मे २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी पंढरपूर अर्बन बँकेचे व्यवस्थापकांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “पंढरपूर अर्बन बँकेच्या राज्यभरात ३० शाखा आहेत. या शाखांमधील २८ एटीएम मशीनमधून विविध बँकांचे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी दुसऱ्या बँकांचे एटीएम कार्ड वापरून तीन कोटी तीन हजार दोनशे रुपये लंपास केले. चोरट्यांनी यासाठी विविध बँकांचे ६६८ एटीएम कार्ड वापरल्याचे उघड झाले. पैसे काढताना चोरट्यांनी एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड केला. एटीएममधून पैसे बाहेर येताच कॅश डोअर अर्थात जेथून पैसे बाहेर येतात त्या शटरमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पैसे येणाऱ्या शटरमध्ये बोट लावताच किंवा पट्टी लावल्यास ज्या बँकेचे एटीएम आहेत तेथे एरर कोड नंबर ९०२ अर्थात अडथळा निर्माण होतो. यामुळे पैसे काढूनही बँकेच्या खात्यांमधील पैसे कमी होत नाहीत.” दरम्यान, या प्रकारामुळे खातेदार, सभासद, ठेवीदारांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही, असे पंढरपूर अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे यांनी सांगितले.
पंढरपूर अर्बन बॅंकेच्या एटीएममधून ३ कोटी लंपास
