सोलापूर- विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे. जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर मंदिर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे. त्यामुळे आता विठ्ठल भक्तांना अल्पदरात नाश्ता व भोजन उपलब्ध होणार आहे.
विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येणार्या भाविकांना चांगली सुविधा मिळत आहे. त्यामुळे मंदिर समितीने उभारलेल्या भक्तनिवासात राहण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. या भव्य भक्तनिवासांमध्ये असलेल्या ३६४ खोल्यांमध्ये जवळपास दररोज १५०० विठ्ठल भक्त राहू शकतात. शिवाय अतिशय आलिशान पद्धतीने उभारलेले नवीन भक्त निवास तर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या भक्तनिवासामध्ये देशभरातून येणार्या भाविकांना चांगल्या प्रतीचा चहा, नाश्ता, भोजन मिळावे. यासाठी या हॉटेलचा ठेका देण्यात आला होता. मात्र, जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर मंदिर समितीने भाविकांना अल्पदरात भोजन देण्यासाठी हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले. शुक्रवारपासून याची सुरुवात झाली. भाविक येथील अल्पदरात मिळणार्या आणि चांगल्या प्रतीच्या खाद्यपदार्थावर समाधानी असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड हे सर्व सुविधांकडे जातीने लक्ष देत आहेत.