पंढरपूर- पुणे जिल्ह्यातील मोठा पाऊस आणि उजनी, वीर धरणांमधील मोठ्या विसर्गामुळे येथील भीमा उर्फ चंद्रभागेला पंढरपूरमध्ये पाऊस न पडताच काल मोठा पूर आला.त्यामुळे चंद्रभागा नदीने धोका पातळी ओलांडत पंढरपूरमधील नदी काठालगतची २० गावे तसेच शहरालगत पूरस्थिती निर्माण केली.सध्या वाळवंटातील सर्व मंदिरे, घाट पाण्याखाली गेली आहेत. शहरातील नदीकाठच्या कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण हे रविवारीच १०० टक्के भरले होते. त्यातच भीमा आणि नीरा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने सर्व धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. यामुळे उजनी धरणातून काल दुपारी तीन वाजता १ लाख ३० हजार क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले.तर दुसरीकडे नीरा नदीच्या खोऱ्यातून येणारे पाणीही वीर धरणातून नीरा नदीला सोडण्यात आले आहे.या दोन्ही धरणातील विसर्गामुळे भीमा आणि नीरा नदीला पूर आला आहे. अकलूजजवळील नृहसिंहपूर येथे या नीरा आणि भीमा नदीचा संगम होतो. या दोन्ही नद्यांचे पुराचे पाणी पुढे एकत्रितरित्या काल पंढरपूरला धडकले. पंढरपूरमध्ये पाऊस न पडताच काल मोठा पूर आला.शहरातील नदीकाठच्या अनेक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व लहान मोठे बंधारे, पूल पाण्याखाली गेले असून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.