सोलापूर – पंढरपूर मंदिरात वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर दरवर्षी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी माता यांचा शाही विवाह सोहळा पार पडतो. यंदाही तो १२ वाजताच्या सुमारास थाटामाटात पार पडला. या सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी सकाळपासूनच अलोट गर्दी केली होती. रुक्मिणी स्वयंवराची कथा झाल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीमध्ये अंतरपाट धरून, मंगलाष्टक म्हणत विधीवत विवाह संपन्न झाला.
दरम्यान, या विवाह सोहळ्यासाठी मंदिर राजवाड्याप्रमाणे फुलांनी सजवले होते. पुण्याचे भारत भुजबळ यांनी या उत्सवासाठी मोफत सजावट करून दिली होती. त्यासाठी विविध रंगीबेरंगी लाल, पांढरा, गुलाबी, पिवळा गुलाब, जिप्सी, डिजी, सुर्यफुल, जरबेरा, तगर, गुलछडी, कामिनी, शेवंती, पासली, काडी, गिलाडो, तुक्स, लाल पिवळा गोंडा, बिजली, अस्टर या सुमारे साडेतीन ते चार टन फुलांचा वापर करण्यात आला होता. याशिवाय एक टन ऊसदेखील अर्पण करण्यात आला.
पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाहसोहळा संपन्न
