पंढरपूर – देशातील उज्जैन व तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपूर येथे कॉरिडॉर करण्यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील आहे. मात्र,येथील स्थानिक व्यापारी व नागरिक आणि महाविकास आघाडीनेदेखील यास विरोध दर्शवला आहे. नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंढरपूर कॉरिडॉर होणार असल्याचे म्हटले आहे. हा कॉरिडॉर रद्द व्हावा,म्हणून मंदिर परिसरातील व्यापार्यांनी चक्क श्री विठ्ठलाला दुग्धाभिषेक घातला.
कॉरिडॉरला विरोध करणार्या व्यापार्यांनी म्हटले आहे की,पंढरपूर हे भक्तिपीठ आहे. इथे पर्यटन केंद्र करुन बाहेरील अपप्रवृत्ती आणू नयेत.रस्ते मोकळे करुन, घरे दारे पाडून भाविकांना सुखसुविधा मिळणार नाहीत. येथे येणार्या भाविकांसाठी राहण्यासाठी सुविधा,मोफत जेवण उपलब्ध करा.त्यांना सुखसुविधा द्या.जर तुम्हाला विकासच करायचा असेल तर नदीपलिकडे भरपूर जागा आहे तेथे काय विकास करायचा तो करा. हवे तर नदीवर चार पूल बांधा. मात्र मंदिर परिसरातील कोणाचीही घरे दारे पाडू नका. विधानसभा निवडणुकीत भाजप आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी कॉरिडॉरच्याबाबतीत आम्ही तुम्हाला विश्वासात घेवून पुढील दिशा ठरवू, असे सांगितले होते. त्यामुळे आम्ही व्यापार्यांनी व बाधित होणार्या नागरिकांनी भाजपा उमेदवाराला मताधिक्य दिले.