प मोहाली
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे आज श्वसनाच्या विकाराने मोहालीतील रुग्णालयात निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. उद्या भटिंडा जिल्ह्यातील अबुल खुराणा या त्यांच्या जन्मगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींसह सर्व राजकीय नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते 4 वेळा पंजाबचे मुख्यमंत्री होते.
प्रकाशसिंग बादल हे गॅस्ट्राइटिस या श्वसनाच्या विकाराने गेल्या वर्षभरापासून आजारी होते. गेल्या आठवड्यात त्यांना अधिक त्रास जाणवू लागल्याने मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या भटिंडा जिल्ह्यातील अबुल खुराणा या त्यांच्या जन्मगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
8 डिसेंबर 1927 साली पंजाबमधील भटिंडा जिल्ह्याच्या अबुल खुराणा या गावातील एका शेतकरी कुटुंबात प्रकाशसिंग बादल यांचा जन्म झाला. गावच्या सरपंच पदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. ते सुरुवातीपासून शिरोमणी अकाली दलात होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेले असल्याने त्यांनी शेतकर्यांच्या अनेक आंदोलनात भाग घेतला. ते 10 वेळा विधानसभेवर निवडून गेले. तर तब्बल 4 वेळा पंजाबचे मुख्यमंत्री होते. भाजपबरोबर त्यांच्या पक्षाची आघाडी होती. पण शेतकर्यांच्या प्रश्नांवर ही आघाडी तुटली आणि त्यांचा पक्ष सरकारमधून बाहेर पडला. दरम्यान मागील विधानसभा निवडणुकीत लांबी मतदार संघातून आम आदमीच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता. बादल यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.