इचलकरंजी- पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या मागणीनुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली.या बैठकीत शेतकर्यांना गाळ घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे प्रदीर्घ काळापासून घुसमट होत असलेल्या पंचगगा नदी पात्राला लवकरच मोकळा श्वास घेता येणार आहे.
मागील अनेक वर्षांपासून पंचगंगा नदीपात्रातील गाळ काढलेला नाही. तसेच मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येत असल्याने तो गाळही बंधार्याच्या दोन्ही बाजूस साचला आहे.तसेच नदीपात्राची खोली कमी झाल्याने पुराचा धोकाही वाढत चालला आहे. त्यामुळे या नदीपात्रात साचलेला गाळ काढणे अत्यंत गरजेचे बनले होते. या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती.यावेळी या नदीतील गाळ उपसण्यासाठी शेतकर्यांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे ज्या शेतकर्यांना शेतीसाठी गाळ हवा असेल त्यांनी स्वतःहून उपसा करून हा गाळ न्यावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.