दुबई- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटपर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताने न्युझीलंडचा 4 गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा या चषकावर आपले नाव कोरले. टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यावर आयसीसीच्या सलग दुसऱ्या स्पर्धेत भारताने अजिंक्यपद पटकावले. भारतातर्फे कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 76 (83 चेंडू) धावा केल्या. तर कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. भारताने न्युझीलंडची 251 या धावसंख्येचा 49 व्या षटकात पाठलाग केला. 6 चेंडूत नाबाद 9 धावा करणाऱ्या रविंद्र जडेजाने चौकार मारत भारताला विजय मिळवून केला आणि दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष केला. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रला मालिकावीर आणि रोहित शर्माला सामनावीर म्हणून घोषित केले.
भारत विरुद्ध न्युझीलंड अंतिम सामना खूपच रंगतदार झाला. या सामन्यातील चढ-उतारांमुळे प्रेक्षकांची उत्कंठाही खाली-वर हेलकावे घेत होती. न्युझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर फलंदाज विल यंग आणि रचिन रवींद्र यांनी 57 धावांची भागीदारी केली. वरुण चक्रवर्तीने यंगला (15 धावा) पायचित करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर कुलदीपच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. त्याने रचिन रवींद्र (38)आणि केन विल्यमसन
(11) यांना एका पाठोपाठ पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ संकटात सापडला. तोपर्यंत न्यूझीलंड सहापेक्षा जास्त धावगतीने धावा करत होता.मात्र, पहिले तीन फलंदाज 18 धावांच्या आत गमावल्यानंतर धावगती साडेचारच्या जवळ आली. डॅरिल मिशेलने टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्ससह डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला.मिचेलने लॅथमसोबत 33 आणि फिलिप्ससोबत 57 धावांची भागीदारी केली.लॅथमला जडेजाने आणि फिलिप्सला वरुणने बाद केले.लॅथमला फक्त 14 धावा करता आल्या आणि फिलिप्सला फक्त 34 धावा करता आल्या.डॅरिल मिशेलने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 8 वे अर्धशतक झळकावले.101 चेंडूत 3 चौकारांसह 63 धावा काढून तो बाद झाला.शेवटी ब्रेसवेलने आक्रमक फलंदाजी केली. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले (नाबाद 53 धावा)अर्धशतक झळकावले. त्यानंतर आठ धावा करून कर्णधार सँटनर धावबाद झाला. न्यूझीलंडने 50 षटकांत 7 बाद 251 धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.जडेजाने एक गडी टिपला .शमीने एका फलंदाजाला बाद केले. एक खेळाडू धावबाद झाला.
न्यूझीलंडने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवर फलंदाज रोहित शर्माने जोरदार फटकेबाजी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. त्याला शुभमन गिलने सावध फलंदाजी करत साथ दिली. 18 षटकांत बिनबाद 103 धावा करून दोघांनी हा सामना भारताकडे झुकवला.दोघांच्या फलंदाजीसमोर न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा फारसा प्रभाव पडला नाही. भारतीय संघाच्या धावफलकावर 105 धावा असताना गिल 50 चेंडूत 31 धावा करुन बाद झाला. फिलिप्सने त्याचा अप्रतिम झेल घेतला. त्यानंतर सामन्याचा नूर बदलला. विराट कोहली ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर केवळ 1 धाव करून पायचीत झाला. न्युझीलंडच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले. रोहित शर्माने श्रेयश अय्यरसोबत भारतीय संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्न केला. परंतु धावांची गती धिमी झाली. चती वाढवण्याच्या नादात रोहित शर्मा (76 धावा) मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला.त्याला रचिनच्या गोलंदाजीवर लॅथमने यष्टीचीत केले. त्यामुळे भारताची अवस्था 3 बाद 122 धावा झाली. त्यानंतर अक्षर पटेल आणि अय्यरची जोडी जमली. त्यांनी एकेक धावा करुन सघांचा धावफलक हलता ठेवला. काइल जेम्सनने अय्यरचा सोपा झेल सोडला. त्यानंतर अय्यर 48 धावांवर बाद झाला. त्याचा रचिनने उत्कृष्ट झेल टिपला. त्यामुळे भारतीय संघ पुन्हा दबावात आला. भारतीय संघाला विजयासाठी 66 चेंडूत 62 धावांची गरज होती. राहुल फलंदाजीसाठी मैदानात येताच अक्षर (28 धावा) बेजबाबदार फटका मारून झेलबाद झाला.त्यानंतर हार्दिक पाड्या आणि राहुल सावध खेळ केला. विजयासाठी भारताला 36 चेंडूत 40 धावांची गरज असताना राहूलने एक चौकार मारला. त्यानंतर पांड्याने ही रचिनच्या गोलंदाजीवर षटकार मारला. संघाला विजयासाठी 16 चेंडूत 11 धावांची गरज असताना पांड्याला जेमिसनने झेलबाद झाला. त्यामुळे जडेजाला फलंदाजीसाठी मैदानावर उतरावे लागले. 49 षटकाच्या अखेर चेंडूवर जडेजाने चौकार ठोकून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. 2000 साली भारताला हरवून न्युझीलंडने ही ट्रॉफी जिकंली होती. भारताने आज त्याची परफेड केली.
न्युझीलंडला हरवून भारत चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता! आयसीसी स्पर्धेत सलग दुसरा शानदार विजय
