नौदलात २ युद्धनौका,१ पाणबुडी दाखल! पंतप्रधानाच्या हस्ते राष्ट्रार्पण

मुंबई- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय नौदलाच्या तीन अत्याधुनिक युद्धनौकांचे राष्ट्रार्पण केले. या युद्धनौकांमध्ये आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस वाघशीर यांचा समावेश आहे. या तीन युद्धनौकांचा समावेश भारतीय नौदलाच्या सामर्थ्याला आणखी एक पाऊल पुढे नेईल, आणि समुद्रात भारताची सुरक्षा अधिक मजबूत होईल.

आयएनएस सुरत- आयएनएस सुरत ही युद्धनौका ‘प्रकल्प १५ बी’ अंतर्गत विनाशिका प्रकारातील आहे. गेल्या तीन वर्षांत नौदलात दाखल झालेल्या ‘आयएनएस विशाखापट्टणम’, ‘मोरमुगाओ’ आणि ‘इम्फाळ’ या युद्धनौकांनंतर ‘आयएनएस सुरत’ ही युद्धनौका आता नौदलात दाखल होत आहे. या प्रकल्पातील ही अंतिम युद्धनौका आहे. सर्वांत मोठी आणि अतिशय आधुनिक अशा विनाशिकांपैकी ही एक. ती ७५ टक्के देशी बनावटीची आहे. या युद्धनौकेचे वजन ७४०० टन असून ती १६४ मीटर लांब आहे. अद्ययावत शस्त्रांनी सज्ज आहे. युद्धनौकेवर चार गॅस टर्बाइन असून ३० नॉटिकल मैल (तासाला ५६ किलोमीटर) वेगाने ती जाऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची क्षमता असलेली ही पहिलीवहिली युद्धनौका आहे. यामुळे नौकेची कार्यक्षमता काही पटींनी वाढली आहे.

आयएनएस नीलगिरी – आयएनएस नीलगिरी हे भारतीय नौदलाने प्रकल्प १७ए अंतर्गत बांधले आहे आणि ते पहिले स्टेल्थ फ्रिगेट देखील आहे. ही युद्धनौका बहुउद्देशीय असून, अशा प्रकारच्या आणखी सात युद्धनौका नौदलात दाखल होणार आहेत. भारताचे सागरी हितसंबंध असलेल्या क्षेत्रात आव्हानांचा सामना करण्यास ही नौका सक्षम आहे. ‘एकात्मिक बांधणी’ तत्त्वानुसार या नौकेची बांधणी केली आहे. यामध्ये नौकेची बांधणी अधिक सोपी जावी, यासाठी ब्लॉक स्तरावर नौकेची बाहेरील बांधणी आधी केली जाते. डिझेल इंजिन आणि गॅस टर्बाइनचा समावेश यात असतो. तसेच यात रॅपिड फायर क्लोज-इन वेपन सिस्टीम आहेत. या युद्धनौकेची लांबी लांबी १४२.५ मीटर असून, ६३४२ टन वजन आहे. ३० नॉटिकल मैल (तासाला ५६ किलोमीटर) वेगाने ती जाऊ शकते.

आयएनएस वाघशीर -आयएनएस वाघशीर ही भारतीय नौदलाने प्रोजेक्ट ७५ अंतर्गत बांधलेली स्कॉर्पिन-क्लासची सहावी आणि शेवटची डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. ही जगातील सर्वात शांत आणि बहुमुखी डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडींपैकी एक आहे. या पाणबुडीची निर्मिती फ्रान्सच्या नौदलाच्या गटाबरोबर संयुक्तपणे करण्यात आली आहे. या पाणबुडीची रचना पृष्ठभागविरोधी युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्त माहिती गोळा करणे, क्षेत्र निरीक्षण आणि विशेष ऑपरेशन्स यासह विविध मोहिमा हाती घेण्यासाठी करण्यात आली आहे. तसेच या पाणबुडीची आवाजाची पातळी अतिशय कमी आहे. तर यात वायर-मार्गदर्शित टॉर्पेडो, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि प्रगत सोनार सिस्टीमसह सशस्त्र पाणबुडीमध्ये मॉड्युलर बांधकाम देखील आहे. यामुळे भविष्यातील एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (एआयपी) तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करणे शक्य होणार आहे. ही पाणबुडी ६७.५ मीटर लांब असून, वजन १६०० टन आहे. ती २० नॉटिकल मैलाने जाऊ शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top