अहमदाबाद –
महात्मा गांधींऐवजी सिनेअभिनेता अनुपम खेर याचा फोटो असलेल्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा वापरून एक कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक करण्याची घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडली. या नोटा वापरून दोन जणांनी दोन किलो सोन्याची खरेदी करून पोबारा केला. पोलिसांनी या बनावट नाटा जप्त केल्या आहेत. परंतु खेळण्यातील वाटतील आणि सहज ओळखता येतील अशा या नोटा वापरून फसवणूक करण्याचे हे सगळेच प्रकरण संशयास्पद असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
या प्रकरणात वापरलेल्या बनावट नोटांवर केवळ अनुपम खेर यांचा फोटोच नाही, तर रिझर्व बँकेऐवजी रिसोल बँक ऑफ इंडिया असे छापले आहे. पोलिसांनी या संदर्भात अशी माहिती दिली की, मेहुल ठक्कर या सराफा व्यापाऱ्याकडे दोन जण सोने खरेदी करण्यासाठी आले. त्यांना तब्बल दोन किलो १०० ग्रॅम सोने हवे होते. सोन्याची एकूण रक्कम १ कोटी ६० लाख रुपये ठरली. त्यांनी या सोन्याची डिलीव्हरी अहमदाबादच्या नवरंगपुरामध्ये करायला सांगितली. त्यानुसार ठक्कर यांनी आपल्या एका नोकराकडे सोने देऊन डिलीव्हरी करण्यासाठी पाठवून त्याला पैसे आणायला सांगितले. नोकराकडून सोने घेऊन त्या दोघांनी त्याला एक नोटांनी भरलेली बॅग दिली. यात १ कोटी ३० लाख रुपये असून उर्वरित ३० लाख रुपये दुकानावर आणून देतो, असे नोकराला सांगितले. त्यानंतर त्यांनी सोने घेऊन तिथून पोबारा केला. नोकराने पैशांची बॅग उघड़ून पाहिली असता त्यात या बनावट नोटा आढळल्या.नोकराने हा प्रकार दुकानावर येऊन मालकाला सांगितला.
मेहुल ठक्कर यांना त्या दोघांची नावेही माहीत नसल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या बनावट नोटांचा व्हिडीओही व्हायरल झाला असून तो अनुपम खेर यांच्यापर्यंतही पोहोचले आहेत. त्यांनी या घटनेवर कुछ भी हो सकता है, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
लहान मुलांना खेळण्यासाठी लहान आकाराच्या खोट्या नोटा वापरल्या जातात. त्यावर नटनट्यांची छायाचित्रे असतात. या नोटा सहज ओळखता येतात. त्यामुळेच अनुपम खेर यांचा फोटो असलेल्या नोटा दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे हे प्रकरण पोलिसांना संशयास्पद वाटत आहे. व्यापार्याने नावेही माहीत नसलेल्या गिर्हाईकांना आगाऊ पैसे न घेताच सोन्याची डिलिव्हरी कशी दिली, त्याचे पैसे घेण्यासाठी नोकराला का पाठवले, नोकराला तीस लाख रुपयांची रक्कम नंतर देतो, या गिर्हाईकांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्यांना सोने कसे दिले, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून पोलीस यात काहीतरी काळेबरे आहे का, याचा तपास करत आहेत.