‘नैना’ विरोधात २३ गावातील ग्रामस्थांचा २० मार्चला चक्काजाम

नवी मुंबई – शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित करून त्यांना देशोधडीला लावणार्‍या सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्र अंतर्गत येणार्‍या ‘ नैना ‘ प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आता २३ गावचे ग्रामस्थ रस्त्यावर उतरणार आहे.२३ दिवसांचे साखळी आंदोलन केल्यानंतर या ग्रामस्थांनी २० ते २२ मार्च दरम्यान पनवेल ते बेलापूरपर्यंत रस्त्यावर उतरून वाहतूक रोखून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
नैना प्रकल्पग्रस्त उत्कर्ष समितीच्या बॅनरखाली हे चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे.या ग्रामस्थांनी असा आरोप केला आहे की, राज्य सरकारने त्यांच्या साखळी आंदोलनाकडे लक्ष दिले नाही.तसेच त्यावेळी १२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत प्रत्येक गावाने एक दिवसासाठी सर्व काम बंद केले होते.सिडको प्रशासन विकसित करत असलेला ‘ नैना ‘ हा २३ गावातील ग्रामस्थांच्या जमिनीवर उभारला जाणारा पायलट प्रोजेक्ट आहे. यासंदर्भात माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले की,आंदोलनामुळे गावकऱ्यांना प्रकल्पाची माहिती मिळेल.खरे तर त्यांच्या जमिनी सिडको कसे काय बळकावू शकते. तसेच सरकारने चालू अर्थसंकल्पीय सत्रात नैना हटविण्याबाबत ठोस निर्णय घेतला नसल्यामुळे आता नाईलाजाने शेतकऱ्यांना आपले काम सोडून रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे,असेही पाटील म्हणाले.’नैना’ च्या पहिल्या टप्प्यात २३ गावांचा समावेश त्यातील ३७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या प्रारुप आराखड्याला मंजुरी मिळाली आहे.

Scroll to Top