मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निर्णयानंतर आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. त्यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, ‘एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार नाही. प्रत्यक्षात तर नाहीच, स्वप्नातही कोणी असा विचार करू नये.’
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरूवारी निकाल दिल्यावर. नैतिकेच्या आधारे शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांचे मत मांडले आहे. पवार म्हणाले, ‘आधीच्या काळातील राजकारण्यांची बात काही और होती. अटल बिहारी वाजपेयी आणि आताच्या काळातील नेते यांच्यात जमीन -अस्मानाचा फरक आहे, आता नैतिकतेच्या आधारावर कोणीही पायउतार होणार नाही आणि शिंदे-फडणवीस राजीानामा देतील असा विचारही करू नका. या निकालाने पक्षांतरबंदी कायद्याला काही अर्थ उरणार आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ती मविआची मोठी चूक ठरली
नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यावेळी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतले नाही. तो राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने नव्या विधानसभा अध्यक्षांबाबत लगेच निर्णय घ्यायला हवा होता. पण तो विषय तातडीने निकालात निघाला नाही. ते पद रिक्त ठेवणे ही आमची चूक झाली असे अजित पवार यांनी कबूल केले. सत्तांतरानंतर भाजपा-शिवसेनेने तत्काळ बहुमताने विधानसभा अध्यक्ष बसवले. त्या वेळी जर आमचा अध्यक्ष असता तर ही वेळच आली नसती आणि १६ आमदार त्याचवेळी अपात्र ठरले असते. असे अजित पवार म्हणाले.