नेरळमध्ये बिबट्याची दहशतग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

कर्जत

नेरळमध्ये बिबट्याने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बेकरे गावातील शेतकऱ्याच्या पाच बकऱ्या बिबट्याने फस्त केल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी गोठ्यातून पळवून नेत बिबट्याने त्या फस्त केल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दरम्यान याबाबत वनविभागाने ग्रामस्थांना खबरदारीचे आवाहन केले असून, मारल्या गेलेल्या बकऱ्यांचे पंचनामे वनविभागाने केले आहेत.

बेकरे हे गाव वनविभागाच्या कर्जत पश्चिम रेंजमध्ये येत असून तेथील शरद हेमा कराळे यांच्या गोठ्यातील पाच बकऱ्या अचानक गायब झाल्याचे निदर्शनास आले होते. पहाटेच्या सुमारास बिबट्याने त्या बकऱ्या फस्त केल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता, मात्र त्यातील एक बकरी ही अर्ध मेल्या अस्वस्थेत जंगलात आढळून आल्याने पहाटे लोकवस्तीत बिबट्या घुसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे वनविभागाने तात्काळ बेकरे गावातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. फस्त केलेल्या बकऱ्याचे पंचनामे वनविभागाकडून करण्यात आले असून शेतकऱ्याला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन वन क्षेत्रपाल खेडेकर यांनी दिले आहे. वनपाल क्षीरसागर यांनी संपूर्ण गावात फिरून रात्रीच्या वेळी एकट्याने घराबाहेर पडू नये आणि कोणत्याही पाळीव प्राण्यांना घराबाहेर ठेवू नये, असे आवाहन ग्रामस्थांना केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top