पॅरिस – 2008च्या बिजींग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे भारताचे दिग्गज नेमबाज अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती 10 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करील. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी अभिनव बिंद्रा यांना पत्र लिहून ही माहिती दिली आहे. बाक यांनी अभिनव यांना पुरस्कार सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यानंतर बिंद्रा यांनी आयओसीचे आभार मानले आहेत. भारताचे क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी आनंद व्यक्त केला आहे.ऑलिम्पिक ऑर्डर हा ऑलिम्पिक मोमेंटद्वारे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे, जो विशेष योगदानासाठी दिला जातो. हा पुरस्कार 1975 मध्ये सुरू झाला. हा पुरस्कार तीन प्रकारात दिला जातो. सोने, रौप्य आणि कांस्य. तेव्हापासून आतापर्यंत 116 सेलिब्रिटींना गोल्ड ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये एका भारतीयाचा समावेश आहे. ऑलिम्पिक मुव्हमेंटला साथ दिल्याबद्दल अभिनव यांना हा सन्मान देण्यात आला आहे. ते ऑलिम्पिक मुव्हमेंट इंडियाशी जोडले गेले आहेत. अभिनव बिंद्रा यांच्यापूर्वी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना हा पुरस्कार मिळाला होता. 1983 साली मुंबईत झालेल्या पुरस्कार सोहळ्यात इंदिरा गांधींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.