नेपाळच्या विमानाला आकाशात आग प्रवाशांना सुरक्षित उतरवण्यात यश

काठमांडू -नेपाळच्या बुद्ध एअर कंपनीच्या एका विमानाला आकाशातच आग लागल्याची घटना घडली. मात्र त्यानंतर या विमानाचे काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावर यशस्वी लँडिंग करण्यात आले. या विमानातील सर्व प्रवासी व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती नेपाळ सरकारने दिली आहे.नेपाळच्या बुद्ध एअर कंपनीचे हे विमान सकाळी काठमांडू विमानतळावरुन हवेत झेपावले. त्याने ४३ हवाई मैलाचे अंतर कापले असताना या विमानाच्या एका इंजिनला आग लागल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. वैमानिकाने हे विमान परत काठमांडूच्या दिशेने फिरवले. सकाळी सव्वा अकरा वाजता या विमानाचे एका इंजिनच्या सहाय्याने यशस्वी लँडिंग केले. विमान कोणत्याही अपघाताशिवाय विमानतळावर उतरल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. या विमानात कर्मचाऱ्यांसह एकूण ७६ प्रवासी होते. या विमानातील सर्वजण सुखरुप असून कोणालाही काहीही इजा झाली नसल्याचे नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. विमानाच्या इंजिनला कशामुळे आग लागली, याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top