मुंबई- मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गट प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश हे देखील उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी शिंदेनी आज ठाण्यातील आनंदआश्रमात जाऊन हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांचे आणि संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. या शक्तिप्रदर्शनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान सेवक चंपा सिंह थापा उपस्थित होते. दरम्यान,आतापर्यंत चारवेळा या विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे हे निवडून आले आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एकनाथ शिंदे म्हणाले की, मी नशिबवान आहे, मतदारांनी एवढे प्रेम माझ्यावर केले. चारवेळा मला आमदार केले. माझ्या संघर्षाच्या काळात पण माझ्यासोबत उभे राहिले. त्यांच्यामुळे मी राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो. मागच्या दोन वर्षात महायुती सरकारने ऐतिहासिक कामे केली आहेत. याची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही.