‘नृत्याची बिजली ‘ म्हणून प्रसिद्धसंध्या माने सोलापूरकरांचे निधन

सोलापूर- ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी संध्या माने – सोलापूरकर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. नृत्याची बिजली अशी त्यांची ओळख होती . संध्या माने या राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या स्व.विठाबाई नारायणगावकर यांच्या द्वितीय कन्या आहेत. दोन महिन्यांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर सोलापूरमध्ये उपचार सुरू होते. मात्र काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात तमाशा कलावंत रोहन, सुरेश सोलापूरकर हे दोन पुत्र आणि एक विवाहित कन्या असा परिवार आहे.

संध्या माने – सोलापूरकर तमाशा या कलेचे बाळकडू त्यांच्या आई विठाबाई यांच्या कडून मिळाले. मातोश्री विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशात वयाच्या दहाव्या वर्षापासून नृत्यांगाना म्हणून काम करण्यास संध्या यांनी सुरवात केली. समई नृत्यांगना म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यात त्या परिचित झाल्या. महाराष्ट्रातील प्रसिद्ध ढोलकी वादक पती रमेश माने यांच्याशी त्यांनी लग्न केले. नंतर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वतःचा नवीन फड तयार केला. पतीच्या निधनानंतर त्यांनी दोन्ही मुलांच्या मदतीने तमाशा फड सुरु ठेवला. त्यानंतर त्यांच्या तमाशा क्षेत्रातील कार्याची दाखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना २०२० साली तमाशा साम्राज्ञी विठाबाई जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मात्र त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील समई व थाळी नृत्य करणारी, नृत्यावर जीवापाड प्रेम करणारी प्राख्यात नृत्यांगना काळाच्या पडद्याआड गेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top