मुंबई – लावणी नृत्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या नृत्यकार आशिष पाटीलवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण कमले यांनी आशिष विरुद्ध तक्रार दिली. आशिषने त्यांच्या सुंदरी कार्यक्रमाची संकल्पना आणि सांस्कृतिक शोच्या नावाची चोरी करून स्वतःचे असल्याचे सांगितल्याचे तक्रारीत नमूद केले.
या तक्रारीनुसार ‘सुंदरी’ या नावाचा ट्रेडमार्क आणि संकल्पना ही त्यांची असून आशिष पाटीलने स्वतःच्या नावाने ती नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे ६ फेब्रुवारी २०२३ ला सादर केली. हे कृत्य ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन आहे. या प्रकरणी प्रवीण कमले यांनी मुंबई उच्च न्यायालयात ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत वाणिज्यिक बौद्धिक संपदा न्यायालयीन गुन्हा दाखल केला. अंतिम निर्णयापूर्वी पुढील नुकसान टाळण्यासाठी तात्कालिक मदतीसाठी अर्ज केला आहे.
प्रवीण कमले यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये अमृतकला स्टुडिओच्या सहकार्याने ‘वर्ल्ड ऑफ स्त्री ’ हा बहुचर्चित नृत्य कार्यक्रम आयोजित केला होता. या शोचे नृत्यदिग्दर्शन व दिग्दर्शन आशिष पाटीलने केले. त्यावेळी प्रवीण यांनी ‘सुंदरी’ नावाच्या लावणी या फ्युजन सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना आशिष पाटीलसमोर मांडली होती. त्यानंतर २९ ऑक्टोबर २०२२ ला प्रवीण यांनी ‘सुंदरी’ नावाचा ट्रेडमार्क मनोरंजन सेवांच्या नोंदणीसाठी अर्ज करून आवश्यक शुल्क भरलेलं नोंदणी केली. परंतु, आशिष पाटीलने ‘सुंदरी: लावणीचा इतिहास’ या नावाने ६ फेब्रुवारी २०२३ ला नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती प्रवीण यांना मिळाली. त्यामुळे त्यांना धक्का बसला.