नुक्कड मालिकेतील \’खोपडी\’
समीर खक्कर यांचे निधन

मुंबई : दूरदर्शनवरील गाजलेली मालिका नुक्कड मधील \’खोपडी\’ ही व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे आज निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. समीर खक्कर यांचा मुलगा गणेश खक्कर यांनी सांगितल्यानुसार, मंगळवारी समीर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर ते बेशुद्ध पडले. समीर यांना बोरिवलीच्या एमएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, मल्टिपल ऑर्गन निकामी झाल्याने पहाटे ४:३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
समीर खक्कर यांनी नुक्कड व्यतिरिक्त सर्कस, मनोरंजन, श्रीमान श्रीमती, अदालत आदि मालिकांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या. \’हसी तो फसी\’, \’पटेल की पंजाबी शादी\’, \’पुष्पक\’, \’दिलवाले\’, \’राजा बाबू\’, \’परिंदा\’ आणि \’शहेनशाह\’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. हिंदी शो आणि चित्रपटांव्यतिरिक्त गुजराती रंगभूमीवरही त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. समीर खक्कर यांनी ४ दशके मनोरंजन क्षेत्रात काम केले होते. समीर खक्कर यांनी १९८७ मध्ये आलेल्या \’जवाब हम देंगे\’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. मधल्या काळात त्यांनी अभिनय कारकिर्दीतून स्वतःला लांब ठेवले होते आणि ते अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यानंतर काही काळानंतर परत आले आणि त्यांनी दोन गुजराती नाटकांमध्ये काम केले. ते सलमान खानच्या \’जय हो\’ या चित्रपटातही दिसले होते. हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. ते चित्रपट आणि टीव्हीवरही तितकेच सक्रिय होते.

Scroll to Top