*मस्क यांना दिलेल्या
मुलाखतीत घोषणा
न्यूयॉर्क- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण निवडणूक जिंकल्यास स्थलांतरितांना हद्दपार करण्याचे देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठे अभियान राबविणार असल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेतील सर्व अवैध स्थलांतरितांना देशाबाहेर काढणार असल्याचे ट्रम्प यांनी एक्स प्लॅटफॉर्मवरील एका मुलाखतीत म्हटले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सीईओ एलन मस्क यांना दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटिकच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर गंभीर आरोप केले. ट्रम्प म्हणाले की,कमला हॅरिस निवडणूक जिंकल्या तर देश अवैध स्थलांतरितांमुळे उद्ध्वस्त होईल. जगभरातून देशात ६ कोटी अवैध स्थलांतरित घुसतील. अमेरिकेत स्थायिक करण्यासाठी जगभरातील देश आपल्या तुरुंगातून गुन्हेगारांना सोडतील. डेमोक्रॅटिक पक्ष व कमला हॅरिस या अवैध स्थलांतरितांच्या सर्वात मोठ्या पाठीराख्या आहेत. कमला हॅरिस डाव्या विचारांच्या आहेत .
कॅपिटल हिंसाचारामुळे एक्सपूर्वीच्या ट्विटरने जानेवारी २०२१ मध्ये ट्रम्पवर बंदी घातली होती. त्यानंतर ट्रम्प प्रथमच या प्लॅटफॉर्मवर आले होते.ट्रम्प यांची मुलाखत ४५ मिनिटे उशिरा सुरू झाली. मस्क यांनी दावा केला आहे की, दोन तासाची मुलाखत सुमारे १३ लाख लोकांनी ऐकली. आगामी काळात १० कोटी लोक ऐकतील. एलन मस्क यांनी डेमोक्रॅटिक उमेदवार कमलांनाही अशाच मुलाखतीचे निमंत्रण दिले आहे.