निवडणूक आयोगाचे दरपत्रक! चहा 10 रुपये! वडापाव 15 रुपये

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर केले आहे. यात अगदी चहा-नाश्त्यापासून ते बैठक, रॅली, सभा, जाहिराती, पोस्टर, वाहनांचा खर्चदेखील समाविष्ट आहे. उमेदवारांना हा सर्व खर्च निवडणूक आयोगाच्या अधीन राहून करावा लागणार आहे. आयोगाने निश्चित केलेल्या दरपत्रकानुसार चहासाठी 10 रुपये तर वडापावसाठी 15 रुपये असा खर्च ठरविण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या दरपत्रकापेक्षा खर्च करून आचारसंहितेचा भंग केल्यास उमेदवारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या दरपत्रकानुसार, चहा-10 रुपये, कॉफी 12 रुपये, नाश्ता -38 रुपये, वडापाव -15 रुपये, शाकाहारी जेवण -110 रुपये, मांसाहारी जेवण- 140 रुपये, पुलाव – 75 रुपये, पुरी भाजी- 60 रुपये,20 लिटरचा पाणी जार – 80 रुपये असा खर्च मोजला जाणार आहे.तसेच प्रतिदिन हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च हा नॉन एसी हॉटेल-1650 रुपये, एसी हॉटेल- 3 हजार रुपये, फोर स्टार हॉटेल सूट- 20 हजार रुपये, फाईव्ह स्टार हॉटेल सूट-50 हजार रुपये असणार आहे. त्याचप्रमाणे वाढती महागाई लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने उमेदवाराला 40 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा 28 लाख होती.
तसेच सभेसाठी खर्च करताना प्लास्टिक खुर्ची प्रतिदिन 10 रुपये, यु पिन बॉक्स- 6 रुपये, काडेपेटी- 1 रुपये, जनरेटर 125 केव्ही- 15 हजार रुपये प्रतिदिन, व्हीव्हीआयपी बुके- 1 हजार रुपये, व्हीआयपी पुष्पहार 12 फुटी डबल- 2 हजार रुपये, पार्टी झेंडा (एक फूट) प्रति नग- 25 रुपये, पार्टी झेंडा (दोन फूट) प्रति नग- 50 रुपये, टोपी प्रति नग- 12 रुपये, स्कार्फ प्रति नग- 10 रुपये, ढोल-ताशा पथक प्रति व्यक्ती 1 हजार रुपये, बँड पथक- 1200 रुपये असा खर्च मोजला जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top