मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाने प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर केले आहे. यात अगदी चहा- नाश्त्यापासून ते बैठक, रॅली,सभा,जाहिराती, पोस्टर, वाहनांचा खर्चदेखील समाविष्ट आहे. उमेदवारांना हा सर्व खर्च निवडणूक आयोगाच्या अधीन राहून करावा लागणार आहे. आयोगाने निश्चित केलेल्या दरपत्रकानुसार चहासाठी १० रुपये तर वडापावसाठी १५ रुपये असा खर्च ठरविण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या दरपत्रकापेक्षा अधिकचा खर्च करून आचारसंहितेचा भंग केल्यास उमेदवारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे.निवडणूक आयोगाच्या दरपत्रकानुसार, चहा-१० रुपये, कॉफी १२ रुपये,नाष्टा -३८ रुपये, वडापाव -१५ रुपये, शाकाहारी जेवण -११० रुपये,मांसाहारी जेवण- १४० रुपये,पुलाव – ७५ रुपये, पुरी भाजी- ६० रुपये,२० लिटरचा पाणी जार – ८० रुपये असा खर्च मोजला जाणार आहे.तसेच प्रतिदिन हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च हा नॉन एसी हॉटेल-१६५० रुपये,एसी हॉटेल- ३ हजार रुपये,फोर स्टार हॉटेल सूट- २० हजार रुपये, फाईव्ह स्टार हॉटेल सूट-५० हजार रुपये असणार आहे. त्याचप्रमाणे वाढती महागाई लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने उमेदवाराला ४० लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा २८ लाख होती.
तसेच सभेसाठी खर्च करताना प्लॅस्टिक खुर्ची प्रतिदिन १० रुपये, यु पिन बॉक्स- ६ रुपये, काडेपेटी- १ रुपये, जनरेटर १२५ केव्ही- १५ हजार रुपये प्रतिदिन, व्हीव्हीआयपी बुके- १ हजार रुपये, व्हीआयपी पुष्पहार १२ फुटी डबल- २ हजार रुपये, पार्टी झेंडा (एक फुट) प्रतिनग- २५ रुपये, पार्टी झेंडा (दोन फूट) प्रतिनग- ५० रुपये, टोपी प्रतिनग- १२ रुपये, स्कार्फ प्रतिनग- १० रुपये, ढोल-ताशा पथक प्रति व्यक्ती १ हजार रुपये, बँड पथक- १२०० रुपये असा खर्च मोजला जाणार आहे.