लखनऊ – उत्तर प्रदेशातील नगरपालिका निवडणुकीत एक धक्कादायक निकाल लागला आहे. निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवार आयुष्याच्या लढाईत पराभूत झाला आहे. संतराम असे मृत उमेदवाराचे नाव आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधीच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे त्याठिकाणी आता पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे.
सुलतानपूरच्या कादीपूर नगरपालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहिलेले उमेदवार संतराम हे निराला नगर वॉर्डातून विजयी झाले आहेत. त्यांचा अवघ्या तीन मतांनी विजय झाला आहे. संतराम यांना एकूण २१७ मते मिळाली. संतराम यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार रमेश यांचा पराभव केला.
उमेदवार संतराम यांनी शेती आणि व्यवसाय सांभाळत निवडणूक लढवली. बियाणे,फळे, भाजीपाला यांचा ते व्यवसाय करायचे.संतप्रसाद ६५ वर्षांचे होते. २ मुले,५ मुली असे त्यांचे मोठे कुटुंब आहे. संतराम शेतात काम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांची जागा रिक्त झाल्याने निराला प्रभाग क्रमांक १० मध्ये पुन्हा पोटनिवडणूक होणार आहे.