जालना – मराठा आरक्षणाच्या मागणीवरून रान उठविणारे, विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरविण्याची भीष्मप्रतिज्ञा करणारे, देवेंद्र फडणवीस यांना इंगा दाखविण्याची भाषा करणारे, सुपडा साफ करतो म्हणणारे मनोज जरांगे-पाटील यांनी आज अचानक न पटणारे कारण देत भूमिका बदलत निवडणुकीतून पूर्ण माघार घेण्याची घोषणा केली. मी एकही उमेदवार उभा करणार नाही असे त्यांनी जाहीर केले. जरांगे यांनी निवडणुकीतून नुसतीच माघार घेतलेली नाही तर त्यांनी आजवर शेकडो वेळा जाहीर केलेल्या ‘याला पाडा, त्याला पाडा’ धोरणालाही सपशेल सोडचिठ्ठी दिली.
काल रात्री उशिरापर्यंत मित्रपक्षांकडून (मुस्लीम व दलित नेते) इच्छुक उमेदवारांची यादीच आली नाही. त्यामुळे एका जातीच्या आधारे निवडणूक जिंकणे शक्य नाही, असे कारण देत जरांगे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या अचानक बदललेल्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यामुळे खूश झाले तर राऊत म्हणाले की, जरांगेसाहेब यांचे राजकीय आंदोलन नसून सामाजिक आंदोलन आहे.
गेले वर्षभर मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची जनतेत आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होती. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावीत, मराठ्यांच्या सगेसोयर्यांनाही सरसकट जातप्रमाणपत्र द्यावीत, अशा मागण्यांवर ठाम असलेले जरांगे यांचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत दिसून आला. सत्ताधारी महायुतीला जरांगे फॅक्टरमुळे चांगलाच फटका बसला. लोकसभा निवडणुकीत जरांगे यांनी आपले उमेदवार दिले नव्हते. मात्र वारंवार मागणी करूनही सरकारने मराठा आरक्षणावर काहीही निर्णय न घेतल्याने जरांगे आक्रमक झाले होते. विधानसभा निवडणुकीत सत्ताधार्यांना धडा शिकवण्यासाठी उमेदवार देण्याची भूमिका जरांगे यांनी घेतली होती. राज्यातील काही निवडक मतदारसंघांत उमेदवार देणार, काही ठिकाणी उमेदवार पाडणार आणि काही ठिकाणी ठराविक उमेदवारांना मदत करणार, अशी त्रिसुत्री भूमिका जरांगे यांनी मांडली होती.
बीडमधली नारायणगड येथील दसरा मेळाव्यात जरांगे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली होती. ते सातत्याने कार्यकर्त्यांशी चर्चा करीत होते. त्यांनी उमेदवारी अर्ज मागवले, उमेदवारांशी चर्चा सुरू केली. काल सकाळपासून त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये मॅरेथॉन बैठक घेऊन आम्हाला बेजार करणार्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही अशी गर्जना केली होती. मराठवाड्यातील आपल्या उमेदवारांची संभाव्य यादीदेखील जाहीर केली होती. त्यामध्ये केज (राखीव-बीड जिल्हा), परतूर (जालना), फुलंब्री (छ. संभाजीनगर), बीड, हिंगोली, पाथरी (परभणी), हदगाव (नांदेड), निफाड, नांदगाव, धुळे, लोहा, कळंब, धाराशिव, पर्वती, पाथर्डी, बसमत, कन्नड आदि मतदारसंघांचा समावेश होता. मात्र ही यादी अंतिम नाही असे काल जरांगे यांनी सांगितले होते. ज्या मतदारसंघांमध्ये उमेदवार पाडायचे त्या मतदारसंघांची संभाव्य यादीही जरांगे यांनी काल दिली होती. त्यामध्ये भोकरदन (जालना), गंगाखेड (छ.संभाजीनगर), कळमनुरी (हिंगोली), गंगाखेड (परभणी), जिंतूर (परभणी), औसा (लातूर) या मतदारसंघांचा समावेश होता. तर बदनापूर (जालना, राखीव) व छत्रपती संभाजीनगर पश्चिम या मतदारसंघांमध्ये जरांगे-पाटील उमेदवारांना पाठिंबा देणार होते. मात्र दिवसभर बैठका घेऊनही काल रात्री उशिरापर्यंत यादी अंतिम झाली नव्हती. आज सकाळी पत्रकार परिषदेत जरांगे उमेदवारांची नावे जाहीर करणार होते. मात्र सकाळी त्यांनी आपल्या आधीच्या भूमिकेचा पूर्णपणे त्याग केला. एका जातीच्या आधारे निवडणूक जिंकता येऊ शकत नाही. मराठा उमेदवार जर पराभूत झाला तर संपूर्ण समाजाची नाचक्की होईल. त्यामुळे आपण निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतल्याचे जरांगे यांनी सांगितले. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्व मराठा बांधवांनी अर्ज मागे घ्यावेत, असे आवाहन जरांगे यांनी केले.
वटवाघूळ औकातीवर आले
लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
जरांगे यांच्या या बदललेल्या भूमिकेवर विविध पक्षांच्या नेत्यांकडून सावध प्रतिक्रिया आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि जरांगेंच्या संपूर्ण आंदोलनात टीकेचे धनी ठरलेले छगन भुुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी जरांगेंच्या भूमिकेचे स्वागत केले. तर मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये अशा मागणीसाठी आंदोलन करणारे ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मात्र जरांगेंवर सडकून टीका केली. शेवटी वटवाघूळ आपल्या मूळ औकातीवर आले, अशा शब्दांत हाके यांनी जरांगेंवर हल्लाबोल केला. जरांगे हे कोणाच्या बारामतीच्या सांगण्यावरून निवडणुकीत उतरण्याची भाषा करत होते. आता त्याच कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला आहे, असे हाके म्हणाले.