अकोला- निवडणुकीच्या ६० दिवसाच्या काळात विदर्भातील तब्बल १६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज देत शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पावले टाकावीत अशी मागणी किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केले आहे.
अजित नवले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या ६० दिवसांच्या काळात विदर्भातील तब्बल १६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. उर्वरीत राज्यातदेखील अशा आत्महत्या वाढत आहेत. शेतीमालाचे भाव सातत्याने पाडण्याचे धोरण, वाढता उत्पादन खर्च व नैसर्गिक आपत्तीत होणारे शेतकऱ्यांचे नुकसान या प्रमुख कारणांमुळे शेतकऱ्यांच्या या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकरी आत्महत्यांची बाब लक्षात घेत महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे. तसेच सरकारने शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पावले टाकावीत. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून शेतीमालाला रास्त दर देत, नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांना दिलासा देणारी धोरणे राबवावीत.