पाटणा- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्तचे राष्ट्रीय प्रवक्ते के.सी.त्यागी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. व्यक्तिगत कारणासाठी आपण हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले असले तरी लोकशाही आघाडी सरकारच्या विरोधातील त्यांनी केलेल्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. के.सी.त्यागी यांच्या जागी राजीव रंजन प्रसाद यांची नेमणूक करण्यात आली आहे.
के.सी. त्यागी हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निकटवर्तीय समजले जातात. गेल्या काही दिवसांमधील त्यांच्या काही विधानांमुळे केंद्र सरकार नाराज होते. आयएएस अधिकारी म्हणून लॅटरल प्रवेश पद्धत, इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात भारताने इस्रायलला शस्त्रपुरवठा करू नये. तसेच गाझा पट्ट्यात शांतता राखण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा अशी काही वक्तव्ये त्यांनी केली होती. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नाराजी होती. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यायला लावला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. के.सी. त्यागी अनेक वर्ष खासदारही राहिलेले आहेत.