नितीन देसाईंच्या स्टुडिओला उच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबई- प्रसिद्ध दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडीज् आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरुद्ध प्राप्तिकर विभागाने जारी केलेला आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. न्यायमूर्ती महेश सोनक व न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या योग्य परवानगीशिवाय अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्तांनी हा आदेश काढला असा ठपका ठेवत खंडपीठाने तो रद्द केला.
एनडीज् आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला २०२०-२१ या आर्थिक वर्षात प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यास दहा महिन्यांचा उशीर झाला होता.कोरोनामुळे हा उशीर झाला आहे. हा विलंबाचा भार माफ करावा, असे कंपनीचे म्हणणे होते. मात्र प्राप्तिकर उपायुक्तांनी ही मागणी फेटाळून लावत अतिरिक्त भार आकारला. तसे आदेश जारी केले. त्याविरोधात कंपनीने याचिका केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने एनडीज् आर्ट वर्ल्डने केलेला युक्तिवाद मान्य केला व प्राप्तिकर विभागाचा आदेश घटनाब्ह्य ठरवून रद्द केला. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ११९(२)(ब) अंतर्गत सक्षम प्राधिकरण म्हणून सीबीडीटीने हा आदेश काढणे अनिवार्य होते. तथापि, सीबीडीटीने आदेश काढलेला नाही. त्याचप्रमाणे कोरोना काळातील अडचणींच्या कारणास्तव इतर प्रकरणांमध्येही अशाच प्रकारचा विलंब माफ करण्यात आल्याचा दावा कंपनीने प्राप्तिकर विभागाच्या आदेशाप्रकरणी दिलासा मागताना केला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top