मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या काल जाहीर झालेल्या निकालावर आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली.या निकालाला सर्वस्वी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड जबाबदार आहेत,अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आपल्या कार्यकाळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील फूट आणि आमदार अपात्र या घटनात्मकदृष्ट्या अत्यंत संवेदीशील मुद्द्यांवर अडीच वर्षे फक्त तारीख पे तारीख असा खेळ केला. निकाल न देताच ते निवृत्त होऊन निघून गेले.त्यांची ही कृती देशाच्या इतिहासात काळ्याकुट्ट अक्षरांत लिहिली जाईल. इतिहास चंद्रचूड यांना कदापि माफ करणार नाही. ज्यांच्यावर देशाच्या राज्यघटनेचे रक्षण करण्याची जबाबदारी होती त्यांनी ती प्रामाणिकपणे पार न पाडता घटनाबाह्य सरकारला आपल्या कृतीतून मदत केली. त्यांनी वेळीच निर्णय दिला असता तर आज वेगळे चित्र दिसले असते,अशा शब्दात राऊत यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
हा निकाल जनतेने दिलेला नाही. तो आधीच ठरविण्यात आला होता. मतदानाचे केवळ सोपस्कार पार पाडण्यात आले. त्यामुळे हा निकाल संशयास्पद आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या, सुशिक्षित तरुणांमधील बेरोजगारी, महिला सुरक्षितता, शेतमालाला हमीभाव असे अत्यंत गंभीर मुद्दे होते. ते सर्व तसेच रहावेत म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने मोदी-शहांच्या गुजराती लॉबीला भरभरून मतदान केले ,असे म्हणायचे का, असा प्रश्न या निकालाने आम्हाला पडला आहे. गुजराती लॉबीने ठरवून लावलेला हा निकाल आहे,असे राऊत पुढे म्हणाले.