शिमला –
कर्नाटक निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शिमला येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. देशाच्या सुख-समृद्धीसाठी त्यांनी प्रार्थना केली. मंदिर ट्रस्टच्या सदस्यांनी प्रियांकाला बजरंगबलीचे चित्रही भेट म्हणून दिले होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील प्रचार हा हनुमानाच्या मुद्द्यावरून गाजला होता. प्रियांका गांधी यांचा मंदिरातील व्हिडिओ काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी सुरू असताना मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई यांनी हुबळी येथील हनुमान मंदिराला भेट दिली होती. कर्नाटक निवडणुकीदरम्यान बजरंग दल बंदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. राज्यात सरकार येताच बजरंग दल, पीएफआयवर बंदी घालू आणि जात आणि धर्माच्या आधारे समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या सर्व संघटनांवर कठोर कारवाई करू, असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते. या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग दलाचा बजरंग बलीशी संबंध जोडत काँग्रेसवर निशाणा साधला होता. निकालाचे कल हाती आल्यावर दिवशी प्रियांका गांधी यांनी हनुमान मंदिरात जाऊन भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.