नाशिक रहाड रंगपंचमीतील गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज

नाशिक : मुंबईमध्ये होळी आणि रंगपंचमी साजरी झाल्यांनतर रविवारी नाशिकमध्ये रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र यंदा नेहमीपेक्षा तुफान गर्दी नाशिकमध्ये पहायला मिळाली. त्यामुळे नाशिकच्या प्रसिद्ध रहाड उत्सवा दरम्यान, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे रहाडीत उड्या मारत साजऱ्या होणाऱ्या या रंगपंचमीचा काहीसा बेरंग झाला.

रहाडीची परंपरा जोपासणारे नाशिक हे एकमेव शहर आहे. पेशवेकाळापासून येथे रहाडीत रंग खेळण्याची परंपरा आहे. गरम पाण्यात नैसर्गिक रंग टाकून तो उकळवला जातो, त्यानंतर तो रंग रहाडीत टाकला जातो. रहाड़ीमध्ये डुबकी घेत रंग खेळला जातो. यंदा रंगपंचमीला शहरातील पाच रहाडी खोदण्यात आल्या होत्या.

रहाडीत रंग खेळण्यासाठी तरुणांची तुफान गर्दी झाल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे. त्याचबरोबर तिवंधा चौकातील रहाड बंद करण्यात आली. नाशिकमध्ये आज सकाळपासून रंगपंचमीचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता. शहरातील चार प्रमुख रहाड देखील खुल्या करण्यात आल्या होत्या. मात्र शहरातील तिवंधा चौकात रंगपंचमी खेळण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांकडून तात्काळ गर्दीला हटविण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट रहाड बंद करण्यात आले.

Scroll to Top