नाशिक – नाशिक शहरासह जिल्ह्यात काल मध्यरात्रींपासूनच जोरदार पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांची पाणीपातळी वाढल्याने अनेक धरणांमधून विसर्ग सुरु करण्यात आला. यामुळे नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीलाही पूर आला. गोदाकाठावरील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. दुतोंडी मारूतीच्या चरणापर्यंत पाणी आले होते . नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले .
नांदूरमधमेश्वरमधून गोदावरीत ४० हजार क्यूसेकचा विसर्ग करण्यात आला. दारणा धरणातील विसर्गही वाढवण्यात आला. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ७५ टक्के इतके भरले आहे. नाशिक जिल्ह्यताील धरणांमधून विसर्ग करण्यात आल्यानंतर नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीसाठी पाच टीएमसी पाणी सोडण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. सुरगाणा तालुक्यातील मौजे.चिचंदा येथे नदी ओलांडण्याचा प्रयत्न करणारी एक महिला अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे वाहून गेली. दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरण भरल्यामुळे कादवा नदीला पूर आला तर मनमाड येवला भागाला आर्वतन सोडण्यात आले. गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे, नगर, सोलापूर, धाराशीव या जिल्ह्यांच्या पाणीपुरवठ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उजनी धरणाच्या क्षेत्रातील जोरदार पावसामुळे उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रामध्ये २० हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आल्याने भीमा नदी उफाळली . नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खेड तालुक्यातील चासकमान धरणानंतर आज भामा आसखेड धरणातूनही विसर्ग सुरु करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व विदर्भात सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला असून नागपूर, वर्धा, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. उर्वरित विदर्भात सामान्य हवामान होते. अकोला जिल्ह्यातील चोहोट्टा बाजार व कुटासा महसूल मंडळात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली आहेत.