नाशिक – महिनाभर दडी मारुन पावसाने गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.शुक्रवारी पहाटेपासून धोधो कोसळलेल्या पावसामुळे धरणांची पाणीपातळी वाढून अनेक नद्यांना पूर आले.गंगापूर, चणकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने गोदावरी आणि गिरणा नदीला हंगामातील पहिलाच पूर आला होता. पुरामुळे रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली होती.
नाशिक जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या यलो अलर्ट आणखी दोन दिवसांसाठी वाढविला आहे.पुढील चारपाच दिवस जिल्ह्यात अशीच पावसाची स्थिती राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील नद्या,ओढे दुथडी भरुन वाहू लागली आहेत.जिल्ह्यातील सटाणा, कळवण,निफाड,पेठ, सुरगाणा या भागात ही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी शेतात पाणी भरले.