नाशिकमध्ये हरिनाम सप्ताहात महाप्रसादातून 50 जणांना विषबाधा

नाशिक – सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव बार्‍हे गावात हनुमान जयंतीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात हनुमान जयंतीच्या महाप्रसादातून सुमारे 50 हून अधिक जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने ठाणगाव बार्‍हे येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील असंख्य गावकर्‍यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. यानंतर अनेकांना उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाला. त्यांनी तातडीने ग्रामीण आरोग्य केंद्रात धाव घेतली. पाहता पाहता आरोग्य केंद्रामध्ये जवळपास शंभर रुग्ण दाखल झाले. यातील काही जणांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे तर, काही जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Scroll to Top