नाशिक – नाशिकतील चांदवड आणि देवळासह आजूबाजूच्या भागांत काल रात्री मुसळधार पाऊस पडला. परिणामी मुंबई-आग्रा महामार्गावर आणि बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचले. चांदवड तालुक्यातील राहुड बंधारा ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे या भागातील लोकांना चिंचोलीत सुरक्षित स्थळी हलवले. या पावसाचा कांदा आणि भात पिकांना मोठा फटका बसला आहे.नाशिक जिल्ह्यातील चांदवड, देवळा, कळवण, मालेगाव, त्रंबकेश्वर, बागलाण, मनमाड या भागांत काल सायंकाळनंतर जोरदार पाऊस झाला. रात्री १० वाजेनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे रस्त्यांवर नद्यांसारखे पाणी वाहू लागले. अनेक भागांत ५ ते ६ तास वीज पुरवठा खंडित झाला होता. नाशिक शहरात रात्री १० ते १२ वाजेपर्यंत २६.२ मिमी पाऊस झाला. लेंडी आणि परसूल नदीला मोठा पूर आला. त्याचे पाणी मुख्य बाजार पेठेसह अनेक वस्त्यांमध्ये शिरले. गंगापूर धरणातून पुन्हा १ हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरी नदीची पाण्याची पातळी वाढली. या नदीपात्रात चार चाकी गाडी अडकली.
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ
