नाशिकमध्ये गावकऱ्यांनी
गावच विकायला काढले !

नाशिक – शेतमालाला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ संपूर्ण गाव सरकारला विकण्याचा ठराव नाशिकच्या देवळा तालुक्यातील माळवाडी गावकऱ्यांनी केला आहे. कांद्यासह अन्य शेतमालाला भाव मिळत नसल्याने उदरनिर्वाह करण्यासाठी गावच विकण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

माळवाडी गावात ५३४ हेक्टर क्षेत्रावर शेतकरी शेती करतात. मात्र कांद्यासह अन्य पिकांना मागील ३ ते ४ वर्षांपासून अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतीवरच अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मात्र आत्महत्या करण्यापेक्षा गाव विकून आलेल्या पैशांतून उदरनिर्वाह करू अशी भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतली आहे. दैनंदिन गरजा व खासगी, सरकारी बँकांची कर्जे चुकती करण्यासाठी कुठलाही पर्याय उरलेला नसल्याने माळवाडीतील ग्रामस्थांनी एकत्रित येत संपूर्ण गाव विकण्याचा ठराव केला. शेतकऱ्यांच्या गरजा भागवणे आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याइतका तरी शेतमालाला भाव मिळवून द्यावा. अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे आणि ते सरकारने विकत घ्यावे, अशी मागणी माळवाडी गावकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, गावकऱ्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला याबाबत पत्र लिहिले आहे. यात म्हटले की, शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आम्ही गंभीर आर्थिक संकटात सापडलो आहोत. सरकारच्या कुचकामी धोरणांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.आमच्या हिताचे निर्णय न घेता मतदार वाढवण्यासाठी ग्राहक हिताचे निर्णय आपल्यामार्फत सातत्याने घेतले जात आहेत.मात्र यामुळे आमचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मात्र आम्ही आत्महत्या करणार नसून संपूर्ण गाव विक्री करुन उदनिर्वाह करुन सुखी जगणार आहोत.त्यासाठी आता आमचे गाव विकत घेऊन आम्हाला सुखी करावे, असे गावकऱ्यांनी पत्रात लिहिले ली आहे

Scroll to Top