नाशिकमध्ये इलेक्ट्रिक बस धावणार
पहिल्या २५ बस दिवाळीनंतर दाखल

नाशिक

नाशिक महापालिकेच्या महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक बसच्या ताफ्यात ५० नव्या इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. सहा-सहा महिन्यांच्या अंतराने दोन टप्प्यांत ५० बस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील २५ इलेक्ट्रिक बस दिवाळीनंतर येणार आहेत. याकरिता केंद्र सरकार ४० कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील २० कोटी अनुदान महापालिकेला मिळाले आहे.

केंद्र सरकारने २०२४ पर्यंत देशभरातील १३२ शहरांमधील प्रदूषण पातळी २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एन-कॅप योजना) सुरू केली आहे. या योजनेत नाशिकचाही समावेश आहे. वायू प्रदूषण कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेला केंद्राकडून ४० कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले. या अनुदानातून विद्युत शवदाहिनी, यांत्रिकी झाडू खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. दरम्यान, एन-कॅप योजनेत हवा प्रदूषण कमी करण्यासाठी विविध योजनांकरिता निधी वापरण्याची अट समाविष्ट आहे. ही अट बदलून सर्व निधी फक्त इलेक्ट्रिक बससाठीच उपलब्ध व्हावा, यादृष्टीने महापालिकेने प्रस्ताव पाठविला. त्यानुसार, येत्या दिवाळीपर्यंत महापालिकेकडून २५ इलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. तर, उर्वरित २५ बस पुढच्या वर्षी खरेदी केल्या जाणार आहेत. नाशिक परिवहन महामंडळाने जुलै २०२१ पासून सिटीलिंक बससेवा सुरू केली असून शहरात २०० सीएनजी व ५० डिझेल बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूकसेवा पुरविली जात आहे.

Scroll to Top