नाशिक – महापालिका निवडणुकांपूर्वी नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.काँग्रेसच्या माजी नगरसेवक आणि राज्य प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या दोन दिवसात त्या पक्षाचा राजीनामा देणार आहेत.विधानसभा निवडणुकीपासूनच हेमलता पाटील नाराज होत्या.अनेक वर्षे पक्षाचे प्रामाणिक काम करून देखील पक्षाकडून अन्याय झाला,अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
हेमलता पाटील यांनी फेसबूक पोस्ट करुन सांगितले की, जेव्हा तुमची निष्ठा , तुमचा प्रामाणिकपणा ही तुमची कमजोरी समजली जाते.तुम्ही ज्याला आपुलकीचा बंध समजता त्याच बंधाचा वापर तुमच्या भोवती आवळण्याचा फास म्हणून होतो तेव्हा हा बंध झुगारणे हाच एकमेव मार्ग आहे.
हेमलता पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज सुद्धा भरला होता.काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी फोनवरुन त्यांच्याशी चर्चा करुन उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती.त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या.अखेर ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली.मात्र त्या काँग्रेस पक्षात समाधानी नव्हत्या.