नाशिक – नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धीविनायक गणपती मंदिरात चोरीची घटना घडली. यात देवाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पुढील तपास सुरू केला. या चोरीनंतर मंदिराच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
श्री सिद्धीविनायक मंदिर हे नाशिक मधील गजबजलेले आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ठिकाण आहे. येथील गणपतीच्या गळ्यातील चोरट्यांनी देवाच्या गळ्यातील दागिने पळवल्याची घटना घडली. या चांदीच्या गणपती मंदिरात रविवारी पहाटे ही घटना घडली. पहाटे ३ च्या सुमारास एका चोराने लोखंडी रॉडने मंदिराच्या प्रवेशद्वाराची काच फोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षकाने हा सगळा प्रकार बघितल्याने या दोघांमध्ये झटापट झाली. यात सुरक्षारक्षकाच्या डोक्यावर रॉडने मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले. गंगाधर हाके असे सुरक्षारक्षकाचे नाव आहे. त्यानंतर या चोराने बाप्पाच्या मूर्तीवरील ३०० ग्रॅम सोन्याचे पॉलिश केलेले दागिने घेऊन पळ काढला. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेमुळे भाविकांना मोठा धक्का बसला आहे.