नाशिक- परतीच्या पावसाने जिल्ह्यात १३ हजार हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.त्यामुळे दिवाळीनंतर बाजारात होणारी नव्या लाल कांद्याची आवक कमालीची घटली आहे.या दोन्ही परिस्थितीमुळे घाऊक बाजारात कांदा सरासरी ४२ ते ६० रुपये प्रति किलोवर गेला आहे.तर किरकोळ बाजारात कांद्याच्या दराने किलोमागे शंभरी गाठली आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात उन्हाळी कांदा संपतो आणि नोव्हेंबरमध्ये नवीन लाल कांदा बाजारात येतो.याकाळात कांद्याचे दर वाढतात. मात्र यावर्षी परतीच्या पावसाने कांद्याचे गणित बिघडून टाकले आहे. ऑक्टोबर महिन्यात चांदवड, देवळा, पेठ, सिन्नर, नाशिक व निफाड भागास परतीच्या पावसाने झोडपले होते. सुमारे १३ हजार हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले. ज्यांनी आधी लागवड केली होती, त्यांचा कांदा आता काढणीवर येणार होता. शेतात पाणी साचल्याने तो खराब झाला. सिन्नरमध्ये एका शेतकऱ्याला शेतात ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आल्याचे महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले.एरवी, नोव्हेंबरपासून लाल कांद्याची आवक वाढू लागते.परंतु,या परिस्थितीमुळे चालू नोव्हेंबर महिन्यात आवक जेमतेम राहील.डिसेंबरपासून कांद्याची आवक वाढण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.