नाशिक : अवकाळी पावसाने यंदा शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले असताना, आता अवकाळीमुळे साठवून ठेवलेला कांदाही सडत असल्याने शेतकरी नव्या संकटात सापडला आहे. कांदा खराब होऊ लागल्याने लागवडीवरील खर्चही भरून निघणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. काही ठिकाणी तर कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे कांद्याचे बाजारभाव घसरले असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
उन्हाळ्यात कांदा काढणीच्या हंगामात अवकाळी पावसाने धमाकूळ घातला आहे. कांद्याची लागवड केल्यापासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने पिकांचे नुकसान झाले आहेच. मात्र कांदा सहा ते सात महिने चांगला टिकतो. म्हणून तो चाळीत साठवून ठेवला जातो. जेणेकरून योग्य भाव असेल, तेव्हा बाजारात नेता येतो. त्यामुळे अनेक शेतकरी चाळीत त्याची साठवणूक करतात. मात्र यंदा कळवण तालुक्यात चाळीत ठेवलेला कांदा अवघ्या १५ दिवसांत सडत आहे. काही ठिकाणी चाळीतील सर्वच कांदा खराब झाला. त्यामुळे तो जिथे जागा मिळेल, तिथे फेकला जात आहे. अवकाळी पावसाने रब्बी हंगामात गव्हापासून ते उन्हाळी कांदा काढणीपर्यंत धुमाकूळ घालून मोठे नुकसान केले आहे. सततच्या पावसाने संपूर्ण रब्बी हंगाम हातातून गेला. गारा व वादळी वाऱ्यात पावसात शेतातील उभी पिके आडवी झाली. आता कांद्याचे हे नवीन संकट उभे ठाकले आहे.